

Massive fire breaks out at textile shop in Gandhibagh
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
उपराजधानीत गांधीबाग नंगा पुतळा चौक परिसरात रोचलदास सन्स नामक एका कपड्याच्या मोठ्या दुकानात वरच्या माळ्यावर गोडाऊनला भीषण आग लागली. जवळच एक शाळा, हॅण्डलूम मार्केट असल्याने पुरेशी खबरदारी घेत ही आग विझविली गेली.
या विषयी अधिक माहिती अशी की, गांधीबाम नंगा पुतळा चौक परिसरातील रोचलदास सन्स या कपड्याच्या दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या 12 ते 13 गाड्यांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने दुकानात मोठ्या प्रमाणात कापड माल भरलेला होता. या भीषण आगीच्या घटनेत फर्निचर, रेडीमेड कपडे अशी लाखो रुपयांची हानी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या आगीची माहिती समजताच मनपा अग्निशमन विभाग गांधीबाग, लकडगंज, गणेशपेठ आदी ठिकाणच्या गाड्या, कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दुपारपर्यंत धुमसत असलेली ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. बहुदा शॉर्ट सर्किटने ही आग लागली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र या आगीमध्ये सुर्देवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रेडीमेड कपडे आणि फर्णिचर जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे.