नागपूर ः पाडवा अर्थात तान्हा पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी मारबत उत्सव येथे उत्साहात साजरा झाला. देशातीलच नव्हे तर कदाचित जगातील नागपूर एक मात्र असे शहर असावे, जिथे ही सांस्कृतिक, सामाजिक परंपरा 140 वर्षांपासून जोपासली जात आहे. स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिशकाळात 1840 बाकाबाई भोसले यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केल्याच्या निषेधार्थ सुरू झालेली काळी मारबत आजही वाईट चालीरीती, कुप्रथा, देशविघातक शक्ती नष्ट व्हाव्यात म्हणून त्याच उत्साहात निघते. त्याचबरोबर पुतना मावशीचा वध श्रीकृष्णाने केला. त्यानंतर तिचे दहन गावकर्यांनी केले. त्याचेच प्रतीक म्हणून 1845 साली तर्हाने तेली समाजातर्फे जागनाथ बुधवारी येथून पिवळी मारबत उत्सव सुरू झाली.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता या मारबत उत्सवाला सुरुवात झाली. प्रथेनुसार नागपुरातील इतवारी नेहरू पुतळ्याजवळ काळी आणि पिवळी ह्या दोन्ही मारबत भेटल्या. यावेळी 'सर्दी, खोकला, रोगराई, गद्दारी घेऊन जा गे मारबत…' अशी आरोळी ठोकत, जल्लोषात काळी मारबत, पिवळी मारबत समोरासमोर वाकून नमस्कार केल्यानंतर या मारबत उत्सवाची मिरवणूक शहरात फिरली. गेल्या काही वर्षांत तरुण मित्रमंडळांमार्फत मारबत सोबत अनेक बडगेही काढले जातात. यात महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार असे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी चर्चेचा विषय घेऊन बडगे तयार केले जातात. नागपुरात गुरुवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असूनही नागरिकांच्या उत्साहाला उधाण आलेले दिसले. कागदापासून तयार केलेल्या या प्रतिकृती वाचवण्यासाठी आयोजक, मंडळाच्या कार्यकर्त्यांची मात्र दमछाक होत होती. यानिमित्ताने तगडा पोलिस बंदोबस्तदेखील तैनात होता.