

नागपूर : मनीष नगरचा कनेक्टिव्हिटीचा प्रश्न हा गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून कायम असताना यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या काळात एका फ्लायओव्हरची निर्मिती या भागात करण्यात आली. मात्र वाहतुकीची समस्या फारशी सुटली नाही. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ही दुसरी कनेक्टिव्हिटी आपण या भागात सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातून या भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शहरातील सोमलवाडा (मनीषनगर) भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका करणा- या रेल्वे अंडर ब्रिजचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. लवकरच मनीष नगरला जोडणारी तिसरी कनेक्टिव्हिटी ही आपण या भागात तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या लोकार्पणप्रसंगी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आ .कृपाल तुमाने, व्यवस्थापकीय संचालक- महा मेट्रो श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
आता तिसराही उड्डाणपूल महाराष्ट्र सरकारने मंजूर केला आहे. हा उड्डाणपूल थेट हॉटेल रेडिसनजवळ उतरणार आहे. त्यामुळे भविष्यात मनीषनगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांची अधिक सोय होणार आहे. या भागात रेल्वेचे फाटक होते. पण १७० रेल्वे धावत असल्यामुळे नागरिकांना त्रास व्हायचा. आता नवीन अंडरपासमुळे हा त्रास दूर झाला आहे, असे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
सोमलवाडा (मनीष नगर) आरयूबी प्रकल्पाचा एकूण खर्च ३३.८३ कोटी रुपये असून, आरयूबीची लांबी १९० मीटर, रुंदी ८ मीटर आणि उंची ४ मीटर आहे. आरयूबीचे निर्माण मुंबई-हावडा व दिल्ली-चेन्नई या निरंतर व्यस्त रेल्वे मार्गावर करण्यात आले आहे. या अंडर ब्रिजमध्ये पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग देखील उपलब्ध करण्यात आला आहे. आरयूबीमुळे मनीषनगर परिसर आणि वर्धा मार्ग यात चांगली कनेक्टिव्हिटी होईल. याचा मोठा फायदा मनीषनगर, बेसा, घोगली आणि बेलतरोडी येथील नागरिकांना होईल.