

नागपूर : राज्यातील सर्व 29 महापालिका निवडणुकांमध्ये आमची स्थिती चांगली आहे. भाजप नंबर वन पक्ष राहील. किमान 27 महापालिकांमध्ये महायुतीतील तीन पक्षांपैकी एका पक्षाचा महापौर असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री नागपुरात माध्यमांशी बोलताना केला.
सिव्हिल लाईन्स येथील स्वागत लॉनमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता भारत गणेशपुरे यांनी ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ ही प्रकट मुलाखत घेतली. यानिमित्ताने त्यांनी नागपूर शहराविषयीचे विकासाचे आपले व्हिजन स्पष्ट केले. विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यानंतर ते बोलत होते. मुंबईची नव्हे, तर राज्यातील जनताही टीका-टोमण्यांवर नव्हे, तर विकासावर मतदान करणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईला बॉम्बे करण्याचा भाजपचा डाव आहे. या शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी त्यांना फार गांभीर्याने घेत नाही. त्यांच्याकडे सांगण्यासाठी, दाखवायला काहीच नाही. गेली 25 वर्षे त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे अफवांचा बाजार उठवून मते मिळवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र, यावर जनता विश्वास ठेवणार नाही. येत्या 16 जानेवारी रोजी मनपा निवडणुकीच्या निकालात हे स्पष्टपणे दिसेल, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शंभर टक्के पराभव डोळ्यांसमोर दिसत असल्याने ठाकरे याप्रकारे बोलत असल्याचा आरोप केला.
दरम्यान, शिवसेना शिंदे गट म्हणजे शहा सेना, भाजपची बी टीम या उद्धव ठाकरे यांच्या आरोपाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते पहिल्यांदा असे बोलले नाहीत. यापूर्वीदेखील ते बोलले; मात्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जनतेने प्रतिसाद दिला. यानंतरच्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांत आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला. आता महापालिका निवडणुकांमध्येदेखील जनता आमच्या बाजूने विकासाच्या बाजूने कौल देणार असल्याचे त्यांनी सांगितले.