

Maharashtra Legislative Winter Session
नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सोमवारपासून (दि.८) सुरू होत असून ते १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचा कालावधी आठवडाभराचा असला तरी राज्यभरातील आमदारांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंत तेराशेवर लक्षवेधी सूचना दाखल केल्या आहेत. अर्थातच यातील किती लक्षवेधी चर्चेला येतात हे महत्वाचे आहे.
विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, नागपूर येथे १ डिसेंबरपासून सचिवालयीन कामकाजास सुरुवात झाली. केवळ पहिल्या तीन दिवसांत विधान सभेसाठी १,००७ आणि विधान परिषदेसाठी २९६ अशा एकूण तब्बल १,३०३ लक्षवेधी सूचना दाखल झाल्या आहेत. अर्थातच हा आकडा पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. ११ डिसेंबरपर्यंत या सूचना. स्वीकारल्या जाणार आहेत.
दाखल लक्षवेधींमध्ये नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असे पाणीटंचाई, शेती आणि अडचणीतले पीक व्यवस्थापन, कायदा-सुव्यवस्था आणि वाढता गुन्हेगारीचा प्रश्न, औद्योगिक धोरणे व रोजगार, शहर व ग्रामीण वाहतूक समस्या, सार्वजनिक आरोग्य सुविधा, शालेय-उच्च शिक्षणातील उणीवा आदी मुद्द्यांचा समावेश असल्याचे समजते. मात्र, नेहमीचा नागपूर अधिवेशनाचा अनुभव लक्षात घेता शेवटच्या दोन दिवसांतच या लक्षवेधी चर्चेला येण्याची शक्यता आहे.