

नागपूर : महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या धरणासमवेत नदीजोड प्रकल्प, जलसंधारण, जलपूनर्भरण, पाण्याचा पूनर्रवापर व इतर लहान मोठ्या प्रकल्पाची जोड आवश्यक आहे. यादृष्टीने आपण पश्चिमी वाहिनीतील नद्यांमधून समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी 54 टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निश्चय केला.
तापी खोऱ्यातील जे पाणी गुजरात मार्गे समुद्रात वाहून जाते त्यातील 35 टी.एम.सी.पाणी तापी खोऱ्यातच राहील, असे नियोजन केले आहे. भविष्यात महाराष्ट्र हा दुष्काळावर यशस्वी मात करुन उभा राहिलेला महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह येथे तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी बोलत होते. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अतुल वैद्य, वनामतीच्या संचालक डॉ. वसुमना पंत, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे संचालक राजेश सोनटक्के, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर, राष्ट्रीय मृदा विज्ञान ब्युरो नागपूरचे संचालक डॉ. नितीन पाटील, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कृषी सहसंचालक डॉ. उमेश घाटगे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आदि मान्यवर उपस्थित होते.
विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन अनुशेष हा अनेक वर्षांपासून कायम आहे. पाणी नाही म्हणून सिंचन योजना नाही. सिंचना योजना नाही म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही. या दृष्टचक्रामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे विदर्भ असे चित्र तयार झाले. ते दूर करण्यासाठी आपण पाणी नियोजनावर अधिक भर दिला. 2014 मध्ये मी मुख्यमंत्री झाल्यावर बळीराजा योजना आणली. यात 90 योजना साकारल्या. जलयुक्त शिवार योजना राबवित जलसंवर्धन कार्यक्रमावर आपण भर दिला. लोकांनी गावांगावांमधून सुमारे 700 कोटी रुपये एवढा निधी जलसंधारणासाठी लोकसहभागातून उभा केला. या क्रांतीकारी निर्णयातून सुमारे 20 हजार गावांमध्ये चित्र बदलल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पाण्याच्या योग्य वापराबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थी, नागरीक जलदूत म्हणून आपली भुमिका बजावतील असे प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे संचलन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी मानले. यावेळी एसएफएसचे राहुल गौड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, अधिसभा सदस्य तथा परिषदेच्या संयोजक श्रीमती शुभांगी नक्षीणे उंबरकर, डॉ. विजय इलोरकर, डॉ. राज मदनकर, जनकल्याणकारी समितीचे अध्यक्ष सुमंत पुणतांबेकर, दिपक देशपांडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांची उपस्थिती होती.