

नागपूर : विदर्भातील 1997 पासून सुरु असलेली कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था संपूर्ण विदर्भात आज 1035 एक शिक्षकी शाळांचे संचालन करीत आहे. या शाळांमध्ये ३५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात आता महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते चौथी अशा पाच हजार एक शिक्षकी शाळा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली. संस्थेच्या कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय सुरु असलेल्या 'संस्कारातून शिक्षण' या संकल्पनेतून गावातील शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. गावांचाही गावातील नागरिकांच्याच सहभागातून विकास झालेला बघायला मिळत आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरीबाबत महाराष्ट्र सरकार तसेच अनेक खाजगी संस्था व शैक्षणिक संस्थांकडून संस्थेचा यथोचित गौरवही करण्यात आलेला आहे. यावेळी नियमानुसार नवीन कार्यकारी मंडळही गडकरी यांनी जाहीर केले.