

नागपूर : राज्यात यंदाच्या मान्सूनने संथ गतीने प्रवेश केल्याने पेरणीपूर्व तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने 14 जूनपर्यंत महाराष्ट्रात सार्वत्रिक पावसाची शक्यता नाकारली असून या काळात पश्चिम किनारपट्टी वगळता इतर भागांत उष्णतेची तीव्र लाट राहणार आहे. काही भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांतील कमाल तापमान पुढील आठवडाभर 40 अंशांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. विशेषतः पूर्व विदर्भात तापमान 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून उष्णतेमुळे शेती कामांवर परिणाम होणार आहे.
त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, मान्सूनचा पाऊस स्थिर आणि नियमित सुरू होईपर्यंत पेरणी किंवा लागवड सुरू करू नये. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ही सूचना विशेषतः महत्त्वाची असून पावसाच्या कमी प्रमाणामुळे बी-बियाणांचे नुकसान होण्याचा धोका आहे.
याच दरम्यान, मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वर्तविण्यात आली आहे. इतर भागांत मात्र पाऊस खंडित स्वरूपाचा राहणार आहे.
शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचना आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून योग्य वेळीच शेती हंगाम सुरू करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.