

Maharshtra Politics Supriya Sule Claim on Government Land Sale news
नागपूर: फिस्कल मॅनेजमेंट ऍक्ट (Fiscal Management Act) अंतर्गत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती भीषण आहे. आपण अडचण असली की चांदी किंवा सोनं विकतो, मात्र सरकारचा जमिनी विकण्याचा घाट सुरू असल्याचा खळबळजनक दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. नागपूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांसाठी आल्यावर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
वर्ल्ड बँकचा डेटा सांगतोय की, भारत सर्वात जास्त कर्ज घेणारा देश आहे. राज्याची परिस्थिती भीषण आहे. वारंवार कॅबिनेट मंत्री म्हणतात, आमचा निधी कट केला जातोय, याचा अर्थ परिस्थिती चिंताजनक आहे. सरकारी जमिनी विकण्याचा घाट सुरू आहे. सरकार ह्या गोष्टी विकायला लागलं याचा अर्थ आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती चिंताजनक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील गंभीर आर्थिक, सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन राजकीय नेत्यांना केले आहे.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सगळ्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवले, आपण देशासाठी एकत्र आलो. आता महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची वेळ आहे." राजकारण आणि निवडणुका चालत राहतील, मात्र सध्या राज्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती चिंताजनक असल्याने काही विषयांमध्ये राजकारण बाजूला ठेवून राज्याचे हित केंद्रबिंदू ठेवून काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
खा. सुळे यांनी आर्थिक संकटाचा डेटासह उल्लेख केला. त्या म्हणाल्या, "इन्फोसिस आणि इतर सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये हजारो नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे, याचे ग्राउंड रिपोर्ट आम्हाला मिळत आहेत. हे विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे."
राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर लक्ष वेधताना त्यांनी पुणे शहराची बिकट अवस्था सांगितली. सरकारचा डेटा सांगतो महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यात त्यापेक्षाही जास्त गुन्हेगारीत वाढ झाली. पुणे एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर होते, मात्र आता लोकसंख्या वाढली. सर्वात जास्त गुन्हे पुण्यात वाढले आहेत. याचे उत्तर महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना विचारावे लागेल. वाढत्या गुन्हेगारीमुळे महाराष्ट्राची वेगळी ओळख होत असून राज्याच्या प्रतिमेला तडा जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
घायवळ प्रकरण गंभीर असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची दखल घेणे आवश्यक आहे, अशी मागणी खा. सुळे यांनी केली. उशिरा का होईना चौकशी होईल हे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र आणि देशाला सांगितलं. शेतकरी कर्ज काढताना दहावेळा प्रश्न विचारले जातात. फेक पासपोर्ट बनून देश सोडून जातो, हा विषय गंभीर आहे. शेवटी राज्याच्या सुरक्षेचा हा विषय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिव भोजन योजनेतील महिला संचालकांना येणाऱ्या अडचणी अतिशय गंभीर असल्याचे सुळे यांनी सांगितले. शिव भोजन थाळीचे पैसे आठ महिन्यांपासून मिळालेले नाहीत. महिला संचालक भेटल्या, त्या 'आत्महत्या करू का' अस विचारत आहेत, असे त्यांनी सांगितले. या सगळ्या संदर्भात आज रात्री मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्री यांना पत्र देणार असल्याचे देखील खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. गिरगाव कबूतरखाना संदर्भात पोस्टर पाहिले नसल्याने त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला.