

Goldsmith Community Maharashtra :
नागपूर : पुढारी
महाराष्ट्र सरकारनं सराफा व्यवसायिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दक्षता समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सराफा व्यावसायिकांच्या मागणीसाठी अशी दक्षता समिती नेमणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुवर्णकार समाजाच्या मागणीनंतर ही समिती नेमल्याचं सांगितलं.
याबाबत पोलीस आयुक्तालय आणि जिल्हास्तरीय दक्षता समिती स्थापन करण्याचं शासकीय परिपत्रक काढल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सुवर्णकार समाजाच्या मागणीचा विषय हा मुख्यमंत्र्यापर्यंत पोहवला होता. त्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. राज्यस्तरीय समितीमध्ये सुवर्णकार समाजाचे ११ जण समितीवर असणार आहेत.
याचबरोबर कायदा व सुव्यवस्था विशेष पोलीस महानिरीक्षक या दक्षता समितीचे अध्यक्ष असणार आहेत. पोलीस महासंचालकांचे विधी सल्लागार हे देखील या समितीचे सदस्य असणार आहेत. तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून सुवर्णकार संघटनेचे प्रतिनिधींना या समितीचे सदस्यत्व मिळणार आहे.
१४ मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकान्वये या समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता १४ मार्च २०२५ च्या नवीन परिपत्रकानुसार, ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कॉन्सील (All India Gems and Jewellery Domestic Council) यांनी सुचवलेल्या नावांना ३६ जिल्हास्तरीय दक्षता समित्यांमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.
या समित्या स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश, सराफांवर होणारे हल्ले आणि लुटमारीच्या घटनांना आळा घालणे, तसेच त्यांच्या सुरक्षाविषयक समस्यांचे वेळेत व प्रभावीपणे निराकरण करणे हा आहे.
राज्याच्या गृह विभागाने सर्व पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा प्रमुखांना तातडीने या मान्य केलेल्या सदस्यांचा समावेश करून समितीची अंतिम स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीच्या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि सुवर्णकार समाज यांच्यात समन्वय साधला जाईल, ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत अधिक सुधारणा अपेक्षित आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सुवर्णकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.