

नागपूर : नागपूर शहरातील महाल परिसरातील हिंसाचारातील कथित सूत्रधार आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम शमीम खान याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मेहमुना यांनी सोमवारी, ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. फहीमच्या कोठडीची तारीख शुक्रवारी संपली असता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश मेहमुना यांनी फहीमला तीन दिवसांची कोठडी दिली. तर दुसरीकडे फहीमच्या नियमित जामिनावर मंगळवार, १ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
फहीम शमीम खान (३८, रा. संजयबाग कॉलनी, नागपूर) याने चिथावणी दिल्याने दोन गटांत धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरात दंगल घडली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र गाडे यांच्या तक्रारीवरून १८ मार्च रोजी देशद्रोहासह इतर गंभीर गुन्ह्याप्रकरणी फहीम खानला अटक केली होती. आरोपीतर्फे अॅड. अश्विन इंगोले, सरकारतर्फे अॅड. मेघा बुरंगे यांनी बाजू मांडली.