

नागपूर : स्मार्ट प्रीपेड मीटरच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप करत, विदर्भ राज्य आंदोलन समितीने शुक्रवारी (दि.१) सायंकाळी नागपुरात 'मशाल मोर्चा' काढून आपला तीव्र संताप व्यक्त केला. महावितरणकडून गुपचूप मीटर बसवण्याचा घाट घातला जात असून, ही योजना तात्काळ रद्द करावी, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मते, महावितरण कंपनी नागपूरसह संपूर्ण विदर्भात "टीओडी मीटर" या गोंडस नावाखाली प्रत्यक्षात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवत आहे. ही प्रक्रिया ग्राहकांना कोणतीही स्पष्ट कल्पना न देता, गुपचूपपणे राबवली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. "ही योजना केवळ काही उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी आखली गेली असून, सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करण्याचा हा एक सुनियोजित कट आहे," असे समितीने म्हटले आहे. ज्या ठिकाणी हे मीटर बसवण्यात आले आहेत, तिथे वीज बिलात सामान्य दरापेक्षा ४ ते ५ पटीने वाढ झाल्याचे अनेक अनुभव समोर येत असल्याचेही आंदोलकांनी निदर्शनास आणले.
राज्याचे ऊर्जामंत्री यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले होते की, स्मार्ट प्रीपेड मीटर केवळ शासकीय कार्यालये आणि औद्योगिक वसाहतींमध्येच लावले जातील, सामान्य ग्राहकांना याचा कोणताही त्रास होणार नाही. मात्र, प्रत्यक्षात प्रत्येक घरगुती ग्राहकाच्या घरी हे मीटर बसवण्याचा सपाटा सुरू आहे, जे मंत्र्यांच्या आश्वासनाच्या पूर्णपणे विरोधात आहे, असा दावा समितीने केला. एकीकडे मीटरला विरोध होत असताना, दुसरीकडे "स्मार्ट प्रीपेड मीटर लावल्यास दिवसाला प्रति युनिट ८५ पैसे बिल कमी येईल" आणि "येत्या पाच वर्षांत घरगुती वीजदरात २३ टक्क्यांची कपात होईल," अशी प्रलोभने सरकारकडून दिली जात आहेत. मात्र, ही केवळ धूळफेक असल्याची भावना जनतेमध्ये आहे.
गोळीबार चौक येथून सुरू झालेल्या या मशाल मोर्चाचा समारोप गांधीबाग बगीचा येथे झाला. मोर्चादरम्यान सरकार आणि महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या 'मशाल मोर्चा'द्वारे विदर्भ राज्य आंदोलन समितीने शासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत:
स्मार्ट प्रीपेड मीटर योजना तात्काळ रद्द करावी.
वीज दरात सरसकट आणि तात्काळ कपात करावी.
महावितरण आणि सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष
या मोर्चाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी ज्योतीताई खांडेकर, राजेंद्र सतई, गिरीश तितरमारे, रवींद्र भामोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गांधीबाग येथे मोर्चाचा समारोप झाला असला तरी, जोपर्यंत ही योजना मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समितीने दिला आहे. या 'मशाल मोर्चा'मुळे स्मार्ट मीटरचा वाद आता आणखी पेटला असून, महावितरण आणि सरकार यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.