

नागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकासाठी उद्या 20 डिसेंबरला विदर्भात मतदान होत असून मतमोजणी रविवारी 21 डिसेंबरला होणार आहे.
राज्यभरातील नप,नगर पंचायतचे निकाल आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकत्रित रविवारीच लागणार असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार नागपूर जिल्ह्यातील 9 ठिकाणी उद्या मतदान होत आहे. यात कामठी नगर परिषदमध्ये ६ केंद्र संवेदनशिल असून येथे कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्हीसीच्या माध्यमातून २० होणाऱ्या निवडणुकीच्या मतदान तयारीचा तसेच स्ट्रॉग रूमच्या सुरक्षेचा आढावा घेतला. नागपूर जिल्ह्यातील कामठीमधील ३, नरखेडमधील ३, रामटेकमधील १, कोंढाळीतील २ जागांसाठी मतदान होणार आहे. सर्वच २७ नगर पंचायती व नगर परिषदांसाठी २१ डिसेंबरला रविवारी मतमोजणी होणार आहे. २७ स्ट्रॉंग रूमला ३१४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस नगर परिषद (अध्यक्ष व सर्व सदस्य), गडचांदूर नगर परिषद जागा क्र. ८-ब (सर्वसाधारण–महिला), मूल नगर परिषद जागा क्र. १०-ब (सर्वसाधारण), बल्लारपूर नगर परिषद जागा क्र. ९-अ (ना.मा.प्र.) तसेच वरोरा नगर परिषद जागा क्र. ७-ब (सर्वसाधारण) या जागांसाठी मतदान होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा नगरपरिषदेसाठी आणि खामगाव, शेगाव व जळगाव जामोद या नगरपरिषद क्षेत्रातील ७ प्रभागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व आरमोरी या दोन नगर परिषदांमधील चार प्रभागांसाठी शनिवारी मतदान होईल. यात गडचिरोली नगरपरिषदेतील तीन, तर आरमोरी नगरपरिषदेतील एका प्रभागाचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात देवळी येथे नगराध्यक्षासह २० नगरसेवक तसेच वर्धा आणि पुलगाव नगर परिषदेत दोन तर हिंगणघाट येथे तीन नगरसेवकपदाच्या जागेसाठी निवडणूक होत आहे.