

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री जगदंबा महालक्ष्मी देवस्थान येथे सुरू असलेल्या निर्माणधीन भव्य प्रवेशद्वाराचा स्लॅब,काही भाग कोसळल्याची घटना घडली. या मलब्याखाली अनेक मजूर दबले असल्याची भीती व्यक्त केली जात असून आतापर्यंत नऊ जणांना छिंदवाडा रोडवरील मॅक्स आणि नंदिनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जखमी मजुरांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून अद्याप मंदिर व्यवस्थापन, संबंधित रुग्णालयातर्फे कुठलीही माहिती दिलेली नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या मंदिराचे अध्यक्ष असून ते जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस अग्निशमन दलाचे जवान मदत कार्यात गुंतले आहेत.
शक्यतो ढिगाऱ्याखाली कोणीही दबलेले नसावेत असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी व्यक्त केला. मात्र सुरक्षिततेचे सर्व उपाय म्हणून संपूर्ण मलबा काढून बघितला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जखमी मजुरांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची नावे मिळू शकली नाहीत बिव्हिजी कंपनीकडे हे कंत्राट असल्याचे कळते.