

नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून बुधवारी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. मात्र, या गंभीर चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात रंगलेल्या शाब्दिक कोटीने सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.
या योजनेचा सरकारला फायदा झाला. मात्र, ज्यांनी ही योजना आणली ते एक नंबरवरून दोन नंबरवर आले, असा मिश्कील टोला जयंत पाटील यांनी लगावला. विशेष म्हणजे जयंत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या विधानामुळे सभागृहात सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
नेमकी काय झाली जुगलबंदी?
लाडकी बहीण योजनेवर चर्चा सुरू असताना जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या बदललेल्या पदाचा (मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री) उल्लेख करत शंभूराज देसाईंना घेरण्याचा प्रयत्न केला. पाटील म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे सरकार वाचले, पण ज्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली, त्यांची खुर्ची बदलली. ते 1 नंबरवरून 2 नंबरवर आले. तसेच, सभागृहात सध्या 1 नंबरचे नेते उपस्थित नाहीत, म्हणून शंभूराज देसाई 1 आणि 2 नंबरबाबत बिनधास्त बोलत आहेत, असा चिमटाही जयंत पाटील यांनी काढला.
शंभूराज देसाईंचे सडेतोड उत्तर
जयंत पाटलांच्या या गुगलीवर शंभूराज देसाई यांनीही बॅटिंग केली. ते म्हणाले, मी काही वेगळे बोललो नाही. खुद्द एकनाथ शिंदे यांनीच सांगितले होते की, आमच्यात (महायुतीत) पदांची अदलाबदल होत असते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे कायमस्वरूपी दोन नंबरवरच राहतील, असे नाही. भविष्यात चित्र बदलू शकते. देसाई यांनी दिलेल्या या उत्तराने सभागृहात भुवया उंचावल्या.
2100 रुपये योग्य वेळी देऊ
एकीकडे ही राजकीय फटकेबाजी सुरू असतानाच, दुसरीकडे या योजनेतील वाढीव रकमेचा मुद्दाही गाजला. निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. सरकार स्थापन होऊन आता तिसरे अधिवेशन सुरू झाले आहे, मग ही वाढीव रक्कम बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, असे स्पष्ट केले.