गेला मॉडेलिंग करायला पण आला आणि बनावट नोटांमध्ये रमला!
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
मॉडेलिंगसाठी एक युवक मुंबईला गेला त्याने काही दिवस संघर्षही केला. मात्र मॉडेलिंगमध्ये त्याला हवे तसे काम न मिळाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली. शेवटी तो नागपुरात परतला आणि जरीपटका परिसरात एका मित्राच्या मदतीने चक्क बनावट नोटांचा छापखानाच सुरू केला. मध्य प्रदेशातील इंदूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर नागपूर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.
आपल्या हद्दीत बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याची साधी माहिती स्थानिक पोलीसांना मिळू नये या विषयीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मलकित सिंग गुरमेश सिंग विर्क आणि मनप्रीत सिंग कुलविंदर सिंग विर्क रा. चॉक्स कॉलनी अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. मनप्रीत हा मॉडेलिंगसाठी गेला होता. इंदूर पोलिसांनी या दोघांसह सहा जणांना अटक केली आहे. शुभम उर्फ पुष्पांशी मदनरजक जबलपूर, अनुराग धर्मसिंह चव्हाण सिहोर, मोहसीन नासिर खान दाऊदी नगर खजराना मध्य प्रदेश, महिपाल उर्फ मोहित बेडा अशी इतर संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच इंदूर पोलिसांनी नागपुरात छापा टाकून या दोघांना अटक केली.

