

Nagpur Cricket Match VCA Stadium Jamtha
नागपूर : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना येत्या बुधवारी (दि. २१) वर्धा रोडवरील जामठा येथील व्हीसीएच्या स्टेडियमवर होणार आहे. या परिसरात व वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी नागपूर शहर पोलिस वाहतूक शाखेने वाहनांचे मार्ग व पार्किंगच्या जागा निश्चित केल्या आहेत.
सामन्यासाठी येणाऱ्या क्रिकेट रसिकांनी या नियोजित मार्गांनी वाहने आणावी व नमूद केलेल्या पार्किंगच्या जागांवरच आपली वाहने पार्क करावी, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी आज सोमवारी केले. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी क्रिकेट रसिकांनी शक्यतोवर मेट्रोचा वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. या नियोजनात वाहनांनी येण्याचे व बाहेर पडण्याचे मार्गही निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय, दुचाकी व चारचाकी वाहने, स्कूल बस, व्हीआयपी, पोलिस व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी पार्किंगच्या वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. नागपुरातून जामठा येथे सामन्यासाठी येणारी वाहने वर्धा मार्गावरून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मार्गाने जाणाऱ्या डाव्या बाजुच्या रस्त्याने न्यायची आहेत. एनसीआयच्या मार्गावर पुढे गेल्यावर तेथून माऊली नगरीजवळ डावे वळण घेऊन चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागांकडेच आपली वाहने न्यायची आहेत.
दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. पार्किंग कक्ष ‘ए’ या ठिकाणी फक्त व्हिआयपी, पोलिस आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठीच वाहनांचे पर्किंग उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर कक्ष-बी येथे चार चाकी, कक्ष-सी (अन्विता फार्म) येथे दुचाकी वाहने, कक्ष डी-१ येथे एका बाजुला चार चाकी तर दुसऱ्या बाजुला दुचाकी पार्किंग, कक्ष डी-२, डी-३, डी-४, डी-५, इ-(अल्ट्राटेक) येथे चार चाकी वाहनांचे पार्किंग उपलब्ध राहील. कक्ष-जी येथे फक्त मेंबर्स पार्किंग राहणार आहे, तर कक्ष-एच येथे केवळ स्कूल बसचे पार्किंग राहील. कक्ष-आय हा राखीव पार्किंगसाठी ठेवण्यात आला आहे. जामठा टी पाईंटवरून स्टेडियम व जामठा गावाकडे कोणत्याही वाहनांना हा मार्ग वापरता येणार नाही.
वर्धा, बुटीबोरी मार्गाने जामठ्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी कक्ष-एफ (ब्रह्मकुमारी) निश्चित करण्यात आला आहे. येथे एका बाजुला दुचाकी तर दुसऱ्या बाजुला चार चाकी वाहनांचे पार्किंग उपलब्ध आहे. तेथून स्टेडिअमसाठी फिडर बसची व्यवस्था उपलब्ध राहणार आहे. जामठा टी पॉईंटवरून कोणताही प्रवेश होणार नाही. या मार्गाने फक्त खेळाडू व अंम्पायर यांची वाहने नेण्याची मुभा राहणार आहे. त्याचप्रमाणे स्कूल बस वाहनांना एनसीआयच्या समोरून एक युटर्न घ्यावा लागणार असून पुढे गेट नंबर १३ समोर उपलब्ध पार्किगच्या कक्षात वाहने पार्क करावी लागणार आहेत. व्हिसीएच्या सदस्यांची वाहने देखील याच पद्धतीने प्रवेश घेतील.
मेट्रो प्रवाशासाठी फिडर बसची सोय आहे. जामठा येथे क्रिकेट सामन्यासाठी येणार नसलेल्या पण या मार्गाने जाण्यास इच्छूक वाहनचालकांनी २१ जानेवारी रोजी सामन्यापूर्वी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान तसेच रात्री सामना संपल्यावर रात्री १० ते ११.३० दरम्यान हा मार्ग शक्यतोवर टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त मतानी यांनी केले आहे.