illegal sand mining | अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई : चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा!

निट परिक्षेबाबत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे मत, नागपुरात माध्यमांशी साधला संवाद
illegal sand mining | अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई : चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा!
illegal sand mining | अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई : चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा!
Published on
Updated on

नागपूर- नागपूर जिल्ह्यात नियमबाह्य वाळू वाहतूक आणि वाळू चोरीच्या घटना लक्षात आल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाला तत्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रविवारी माध्यमांशी बोलताना दिली. 

 नागपूरसह भंडारा आणि राज्यातील विविध जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी सौ. मित्तल यांनी केलेल्या कारवाईचेही त्यांनी कौतुक केले. राज्यात चुकीच्या पद्धतीने वाळूचे उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही. यासंदर्भात महाराष्ट्रभर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे. मात्र, वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. पाच-सहा ब्रासची रॉयल्टी भरून वीस ब्रास वाळूची वाहतूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कोणतेही मतभेद असल्याचे त्यांना वाटत नाही. पार्थ पवार यांनी कोणत्या कारणासाठी भेट घेतली, याची माहिती माझ्याकडे नाही.

राज्यात मंत्री फेरबदलाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ,यांच्या स्तरावर होणारा हा विषय आहे. “या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही.       

प्रधान यांच्या राजीनाम्याची गरज नाही

नीट परीक्षा प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी पेपरफोडीच्या प्रकाराचा तीव्र निषेध केला. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीला सोडता कामा नये. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कारवाई केली असून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.

काँग्रेसकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असल्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, “अशा प्रकारच्या घटना काँग्रेसच्या काळातही घडल्या आहेत. या विषयावर राजकारण करण्याची गरज नाही. कमी कालावधीत हे प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news