

नागपूर पुढारी वृत्तसेवा : नागपुर शहरातील जातीय दंगली प्रकरणी राज्य सरकार आता कठोर कारवाई करीत आहे. काल सोमवारी दंगलीचा सूत्रधार फहीम खान याच्या घरावर बुलडोझर चालविल्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हिंसाचाराचा आरोपी युसूफ शेख याच्या घराचे बेकायदेशीर बांधकाम पाडले.
नागपूर शहरात दुसऱ्यायंदा योगी सरकारप्रमाणे एका गुन्हेगाराचे घर बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आले. विशेष म्हणजे, दोन्ही कारवाया देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना करण्यात आल्या. पाच वर्षांपूर्वी दारोडकर चौक इतवारी येथील कुख्यात आरोपी संतोष आंबेकरच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली होती.
काल सोमवारी सकाळी महापालिकेच्या पहिल्या कारवाईत हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आला. त्याच वेळी महालमधील जोहरीपुरा येथे फहीमचा सहआरोपी युसूफ शेख याच्या बेकायदेशीर बांधकामावर आणखी एक कारवाई करण्यात आली.
यशोधरानगर येथील संजयबाग कॉलनीतील फहीमचे घर पाडण्यासाठी महापालिकेने २४ तासांची मुदत दिली होती. सोमवारी वेळ संपताच ही कारवाई करण्यात आली. फहीम खानचे घर कोणत्याही परवानगीशिवाय भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर बांधले गेले होते.
प्रशासनाला याची आधीच कल्पना होती आणि घर पाडण्याबाबत फहीम खानला नोटीसही देण्यात आली होती. परंतु कारवाई करताना गांभीर्य पाळले जात नव्हते. नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खान असल्याचे उघड झाल्यावर प्रशासन सतर्क झाले आणि काही दिवसांतच कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर त्याचे घर जमीनदोस्त करण्यात आले.
पाच वर्षांपूर्वी कुख्यात आरोपी संतोष आंबेकरच्या इतवारीतील दारोडकर चौकातील आलिशान बंगल्यावर बुलडोझर चालविण्यात आला होता. आंबेकरने तीन भूखंड एकत्र करून हा बंगला बांधला होता.
महापालिकेने संतोष आंबेकरला बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. सरकार आणि प्रशासनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आंबेकरने ही सूचना हलक्यात घेतली. त्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका आणि नागपूर पोलिसांनी ही कारवाई केली.
दोन जेसीबी आणि एका पोक्लेनच्या मदतीने त्याचा आलिशान बंगला पाडण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या संतोष आंबेकर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तुरुंगात आहे. त्याच्यावर खंडणी, धमकी देणे, खून आणि बलात्कार असे विविध गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
त्या काळात तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी त्यांचे तत्कालीन सहकारी लकडगंज पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि संतोष खांडेकर यांच्यासह दिवसरात्र काम केले आणि आंबेकरचा बंगला पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.या कारवाईमुळे दंगलीच्या इतर आरोपींमध्ये मोठी भीती पसरली आहे.
पोलिसांनी शहरावर पाळत वाढविली आहे. गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी यशोधरानगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर दंगलीनंतर अवघ्या आठ दिवसांत ही मोठी कारवाई करून पोलीस आणि प्रशासनाने आरोपींना थेट इशारा दिला आहे.
नागपुरात झालेल्या हिंसाचारप्रकरणी निर्दोष युवकांची अटक थांबविण्यासाठी असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स (एपीसीआर) नागपूरच्या सदस्यांनी साहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांची भेट घेतली़. यावेळी साहाय्यक पोलीस आयुक्तांनी, निर्दोष व्यक्तींना अटक करण्यात येणार नाही़. या प्रकरणात ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहेत, त्यातील व्यक्ती हिंसाचाराची घटना घडली, तेव्हा घटनास्थळी नव्हते हे सिद्ध करू शकतील तर पोलीस त्यांना सोडून देतील़. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले़
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची व निर्दोष व्यक्तींना मुक्त करण्याची मागणी यावेळी एपीसीआरच्या शिष्टमंडळाने केली. शहरात शांतता अबाधित ठेवण्याचे व कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन यावेळी पोलीस विभागातर्फे करण्यात आले़. शिष्टमंडळात एपीसीआर महाराष्ट्रचे सचिव अॅड़ शोएब इनामदार, अॅड़ बिलाल अहमद, आरिफ बेहलीम, जाकीर शेख, खलीकुज्जमा व शफीक अहमद उपस्थित होते़