

RSS Chief Security Cost Plea Nagpur HC
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेवर होणारा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जावा, यासंदर्भातील जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी (दि. २०) फेटाळून लावली. सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंग यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती.
नागपुरातील संघ मुख्यालय, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेसाठी सुमारे 40 ते 45 लाख रुपये दरमहा खर्च होतात. हा जनतेच्या पैशाचा, लोकहिताच्या रकमेचा दुरुपयोग असून तो संबंधितांकडून वसूल केला जावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.
याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भही दिला होता. केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राज्य वित्त विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले.
मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलेल्या झेड प्लस सुरक्षेचा खर्च सरसंघचालक यांच्याकडून वसूल करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने संघ परिवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.