

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी सकाळी 9.30 वाजता पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशावर पुष्प अर्पण करून तथागत गौतम बुध्दाच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे (दीक्षाभूमी) अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तसेच बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती सोपवा, दीक्षाभूमीसाठी अतिरीक्त जागा देण्यात यावी, या आशयाचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, बोधगया हे जगातील सर्व बौद्धांचे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली होती. या महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती. तेथील 1949 बीटी ॲक्ट रद्द करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावे. तसेच दीक्षाभूमीत येणाऱ्या अनुयायांसाठी जागा अपूरी पडत आहे. भविष्याचा विचार करता माता कचेरी, कॉटन रिसर्च सेंटर येथील 21 एकर जागा दीक्षाभूमीला देण्यात यावी, अशी निवेदनाव्दारे विनंती केली.
याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. राजेंद्र गवई, आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, दादाराव दाभाडे उपस्थित होते.