

नागपूर- प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त नागपुरात रविवारी श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून 90 चित्ररथांची भव्य श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा निघाली. श्री पोद्दारेश्वर राम मंदिर श्रीराम शोभायात्रा शुभारंभ राम रथ ओढताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके आणि मंदिराचे विश्वस्त पुनीत पोद्दार प्रामुख्याने उपस्थित होते. यंदा शोभायात्रेचे 59 वे वर्ष आहे. मोमीनपुरा, हंसापुरी परिसरात अमन शांती सेवा समितीच्या वतीने मुस्लिम बांधवानी उत्साहात स्वागत केले. गुलाब पुष्पवृष्टी केली आणि शांती, प्रेमाचे प्रतीक म्हणून कबुतरे आकाशात सोडली. मध्यंतरी नागपुरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज या स्वागताला वेगळे महत्व होते.
आठवडाभर संचारबंदी अनुभवलेल्या तहसील, कोतवाली, गणेशपेठ पोलिस स्टेशनच्या परिसरातून ही शोभायात्रा जाताना तगडा पोलिस बंदोबस्त तैनात होता. ड्रोनच्या माध्यमातून पोलिस या मार्गावर लक्ष ठेवून होते. यासोबतच पश्चिम नागपुरात रामनगर राम मंदिर येथून तर उत्तर नागपुरात मोतीबाग बेलिशॉप शिव मंदिर येथून श्रीराम शोभायात्रा निघाली, रामभक्तांनी स्वागत केले. यानिमित्ताने शहरात वातावरण राममय झाले. ठिकठिकाणी स्वागतद्वार, सजीव देखावे साकारण्यात आले. रविवारी प्रारंभी पोद्दारेश्वर राम मंदिरातील उत्सवमूर्ती प्रमुख रथात विराजमान होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, निगमायुक्त व सर्वपक्षीय आमदारांच्या हस्ते श्रीराम पंचायतनाचे पूजन झाल्यानंतर रामरथ ओढत या शोभायात्रेस प्रारंभ झाला.
शोभायात्रेत स्केटींग पथक, प्रतिहारी दल, अश्वमेध घोडा, शंखनाद दल, भजन मंडळी, नटराज क्रिडा मंडळाचे आदिवासी नृत्य, रामायण मंडळ, राम संकीर्तन दल, जस गायन आदींसह , बांकेबिहारी दर्शन, महालक्ष्मी जगदंबा कोराडी दर्शन, पंचमुखी हनुमान, रोकडे ज्वेलर्सतर्फे बैद्यनाथ ज्योतिर्लींग दर्शन, केदारनाथ धाम, महाकाली दर्शन, स्वामी समर्थ यांच्या दर्शन, बालाजी दर्शन, कुंभकर्ण निद्रा, बैद्यनाथतर्फे विष्णू अवतार, राधाकृष्ण सिंहासन, प्रयागराज महाकुंभ, वाल्मिकी रामायण रचना, शिवपार्वती विवाह, महर्षी सुदर्शन यांची आराधना, मारीच वध, तुळजा भवानी गोंधळ, महाकाल दर्शन, राम पंचायतन सजीव झांकी, गौमाता राजमाता दर्शन, नरसिंह अवतार, तुलसी रामायण कथा, भक्तीलीन हनुमान आदी प्रमुख 90 चित्ररथ सहभागी झाले.
संपूर्ण मार्गावर स्वागतद्वार, कमानी, रामायणातील देखावे, दिव्यांची रोषणाई, संपूर्ण मार्गावर शोभायात्रेचे समालोचन केले जात होते. ही शोभायात्रा श्री पोद्दारेश्वर राम मंदिर, हंसापुरी, बजेरीया, गोळीबार चौकमार्गे इतवारी, सराफा बाजार, चितारओळ, बडकस चौक, केळीबाग रोड, शिवाजी चौक, टिळक पुतळा, शुक्रवारी तलाव, कॉटनमार्केट चौक, लोखंडी पुल, आनंद टॉकिज, मुंजे चौक, झांशी राणी चौक, व्हेरायटी चौक, मानस चौक मार्गे पुन्हा राम मंदिरात येते.
शोभायात्रेच्या मार्गात भाविकांसाठी विविध संस्था व संघटनांतर्फे प्रसाद,अल्पोपहार , ताक, थंड पाणी, सरबत, बुंदी, पंजिरी प्रसाद, हलवा, फळ वाटप, मिठाई, आलुपोहा आदींचे वितरण करण्यात आले.मंदिरातर्फे देखील शोभायात्रेत प्रसाद वितरण करण्यात आले.