

नागपूर : मुंबईतील राज्याच्या विधान भवनातील लॉबीमध्येच हाणामारी करून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला गालबोट लावलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना कारागृह शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. याप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या विधान भवनाच्या विशेष हक्कभंग समितीने पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांच्यावर कारागृह शिक्षेची शिफारस केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लॉबीमध्येच हाणामारी झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची लक्तरे वेशीर टांगली गेली होती, त्यानंतर कठोर कारवाईची मागणी होत होती.
पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधान भवनाच्या परिसरात घडलेल्या धक्कादायक हाणामारीने संतापाची लाट पसरली होती. भाजपचे आमदार पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली होती. गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून जितेंद्र आव्हाडांनी विधान भवनाच्या परिसरातच ‘मंगळसूत्र चोर’ अशी घोषणा दिली होती. नंतर शाब्दिक चकमकीचे रुपांतर थेट धक्काबुक्कीत आणि नंतर हाणामारीत झाले होते.
या संपूर्ण प्रकरणाची नोंद मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून करण्यात आली. विधान भवनाच्या विशेष हक्कभंग समितीकडून या घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू झाली. समितीचा तपशीलवार अहवाल आता पूर्ण झाला असून तो सभागृहात सादर केला जाणार असल्याचे समजते. तसेच या अहवालानंतर राज्य शासन कशा प्रकार अंमलबजावणी करते, याकडे सार्यांच्या नजरा लागल्या आहे.