

नागपूर : विदर्भाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात महायुती सरकारने ग्वाही दिल्यानंतर आता लवकरच त्याची पूर्तता होण्याची चिन्हे आहेत. अमरावती ते मुंबई अशी आठवड्याला तीन दिवस थेट विमानसेवा या महिनाअखेरीस सुरू होणार असल्याची गोड बातमी आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यासंदर्भात माहिती दिली.
होळीनिमित्त वैदर्भियांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी! म्हणता येईल. अलीकडेच या विमानतळावर उड्डाण यशस्वी झाले. आता अमरावती विमानतळाला डीजीसीएने एअरोड्रोम परवाना दिला आहे. अधिकृतपणे त्याला परवानाधारक प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम (आरसीएस) विमानतळ म्हणून घोषित केले गेले आहे.
अर्थातच, ही कामगिरी या प्रदेशासाठी वाढीव हवाई कनेक्टिव्हिटी, आर्थिक वाढ, पर्यटन आणि विकासाच्या संधींच्या नवीन युगाची सुरुवात म्हणता येणार आहे. अलायन्स एअरची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा सुरुवातीला आठवड्यातून तीनदा आपली सेवा देईल. आम्ही वचनबद्ध केल्याप्रमाणे, अमरावती ते आणि अमरावती विमानसेवा या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल असेही एमएडीसीच्या उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी स्पष्ट केले.