नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नागपुरात आज गुरूवारी (दि. २ नोव्हेंबर) रोजी सकल मराठा समाजातर्फे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. ( Maratha Reservation Agitation )
संबंधित बातम्या
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या हक्कासाठी मनोज जरांगे- पाटील आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जरांगे- पाटील यांना समर्थन देत मराठा समाज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आरक्षणाची मागणी करत आहेत. नागपुरात महाल परिसरात गांधी गेटजवळ आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देवून साखळी उपोषण सुरू केलं आहे. आज गुरूवारी या आंदोलनाचा चौथा दिवशी असल्याने मराठा समाजाचे नेते राजे मुधोजी भोसले, संग्रामसिंह भोसले, मनोज साबळ आदीसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. या आंदोलकांनी ये-जा करणाऱ्या नागरिक, पोलिस, पत्रकार याना गुलाबाचे फुल देत गांधीगिरी केली.
राज्य सरकारने आरक्षण संदर्भात दिलेला शब्द पाळावा, राज्यभरात आजही समाजातर्फे शांततेत आंदोलन सुरु आहे. लाखोंच्या संख्येत मराठा समाज एकवटला असून शातंतेत मोर्चे निघाले हा इतिहास आहे. अशावेळी सरकारने हा प्रश्न लवकर सोडवावा, अन्यथा उद्रेक झाल्यास सर्व जबाबदारी शासनाची राहील असा इशारा राजे मुधोजी भोसले यांनी यानिमित्ताने माध्यमांसमोर बोलताना दिला. ( Maratha Reservation Agitation )