

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहायक आणि एका पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ, मारहाण प्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयात वारंवार गैरहजर राहणाऱ्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची अखेर आज मंगळवारी मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
जाधव यांना न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी सोमवारी अटक केली. मात्र, त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मंगळवारी त्यांची प्रकृती ठिक असल्याचे सांगताच सायंकाळी पोलिसांनी त्यांना मेयो रुग्णालयातून ताब्यात घेतले आणि थेट मध्यवर्ती कारागृहात नेल्याची माहिती सोनेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन मगर यांनी दिली.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाणीची ही घटना १७ डिसेंबर २०१४ रोजी वर्धा रोडवरील हॉटेलमध्ये घडली. त्या दिवशी उद्धव ठाकरे यांची बैठक सुरु असल्याने त्यांनी कुणालाही आत प्रवेश देण्यास मनाई केली होती. दरम्यान, माजी आमदार हर्षवर्धन जाधव हॉटेलमध्ये गेले. एसपीयूचे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला.
परिणामी, हर्षवर्धन जाधव यांनी संतापात जाधव यांना थापड मारली. सोनेगाव पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला व प्रकरणाच्या तपासानंतर सत्र न्यायालयात खटला दाखल केला. तो खटला न्यायाधीश एस. एम. जी. बैस यांच्यासमक्ष प्रलंबित आहे. न्यायाधीशांनी माजी आमदार जाधव यांना वारंवार न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले मात्र ते वारंवार अनुपस्थित राहिले. सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केला. जाधव यांनी सोमवारी न्यायालयात हजर होत अटक वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. यावेळी न्यायालयाने त्यांना बचावात्मक साक्षीदारांची यादी मागितली. परंतु, जाधव यांनी १० दिवसांचा वेळ मागितला. त्यांचा हा निष्काळजीपणा लक्षात घेता न्यायालयाने पोलिसांना अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला.