

नागपूर : दूषित 'कफ सिरप'च्या सेवनामुळे देशभरात लहान मुलांचे मृत्यू झाल्याच्या गंभीर घटना समोर आल्यानंतर भारत सरकारने या संदर्भात कडक दिशानिर्देश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) त्वरित कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत शहरातून २० नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
सध्या नागपूर शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये ० ते १६ वयोगटातील एकूण १२ रुग्ण उपचाराधीन आहेत. या रुग्णांमध्ये मध्य प्रदेशातील १०, महाराष्ट्रातील १ आणि तेलंगणातील १ रुग्णाचा समावेश आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMCH) ६ रुग्ण, एम्समध्ये (AIIMS) २ रुग्ण, तर न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटल, कलर्स हॉस्पिटल आणि गेट वेल हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी १ रुग्ण उपचार घेत आहेत.
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या या दिशानिर्देशांचे शहरात कठोर पालन व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सर्व रुग्णालयांना तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत.
भारत सरकारने लहान मुलांसाठी 'कफ सिरप'च्या वापराबाबत अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, जनतेला वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषधे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२ वर्षांखालील मुलांना टाळा : लहान मुलांमध्ये खोकल्याचे आजार अनेकदा औषधांशिवाय आणि केवळ पुरेशा आराम व अधिक पाणी पिण्यासारख्या गैर-औषधी उपाययोजनांनी बरे होतात. त्यामुळे २ वर्षांखालील मुलांना सर्दी किंवा खोकल्यासाठी औषधे देणे पूर्णपणे टाळावे.
डॉक्टरांच्या देखरेखीखालीच औषध : ५ वर्षांवरील मुलांना खोकल्यासाठी औषधांची आवश्यकता भासल्यास, ते काळजीपूर्वक वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि योग्य डोसमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखालीच द्यावे.
बहु-औषध संयोजन (Combinations) टाळावे : खोकल्यासाठी अनेक औषधांचे संयोजन (Combination) असलेले सिरप देणे शक्यतो टाळावे.
या दिशानिर्देशांचे पालन करून लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.