

Nagpur Mumbai rail roko
नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर–मुंबई रेल्वेमार्गावर आज (दि.२९) सकाळी शेकडो शेतकरी आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन सुरू केले. प्रहार जनशक्ति संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला अल्टीमेटम संपल्यानंतर या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. दरम्यान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून आंदोलकांना रेल्वे रूळांवरून बाजूला केले.
शेतकरी रेल्वेच्या रुळांवर झोपून आपला निषेध नोंदवत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना रुळावरून खाली उतरविण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आंदोलक ठाम आहेत. सरकारच्या धोरणाने आधीच आम्हाला मारले आहे. आता सरकार आम्हाला मरण्यासाठी मजबूर करत आहे, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना सांगितलं की, “सरकारने सोयाबीनला ५ हजार रुपये हमीभाव जाहीर केला असला तरी व्यापारी फक्त ३ हजार रुपये दर देत आहेत. एक क्विंटल सोयाबीन उत्पादनावर आमचा खर्चच ७ हजार रुपयांपर्यंत जातो. मग आम्ही जगायचं कसं?”
या आंदोलनाला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही लढाई शांततेत लावून धरायची आहे. मात्र, शांततेसोबत आक्रमकपणा देखील हवा. आम्ही जातीसाठी लढतो तसं मातीसाठीही लढतो. शेतकऱ्यांच्या एकजुटीसाठी आम्ही २ नोव्हेंबरला अंतरवाली येथे जमणार होतो, पण नागपूर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ती बैठक रद्द केली आहे. कारण आता सगळ्यांनी एकत्र दिसलं पाहिजे.
नागपुरात बैठक घेऊ नये, असे मत व्यक्त करणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ते काही दहशतवादी आहेत का? तिथं जाऊन बैठक घेऊ नये, असं का म्हणता? जातीच्या व्यासपीठावर तुम्ही जाता, पण शेतकऱ्यांच्या आंदोलन ठिकाणी का जात नाही? हे योग्य नाही.
सध्या परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आंदोलक शांततेत असले तरी त्यांचा आक्रोश वाढत आहे. मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू या दोघांच्या भूमिकेमुळे आंदोलनाला नवी दिशा मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या विशेषतः सोयाबीन आणि इतर पिकांच्या हमीभावाबाबत सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.