

नागपूर : "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आणि कार्यातून वंचितांच्या विकासासाठी दाखवलेल्या मार्गावरच राज्य सरकारची वाटचाल सुरू राहील," अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. नागपूर येथे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
अण्णाभाऊंच्या कार्याचे महत्त्व विषद करताना मुख्यमंत्री म्हणाले, "संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या ज्वलंत गीतांनी ऊर्जा देण्याचे आणि समाजातील वंचितांचा आवाज बुलंद करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले. 'पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नव्हे, तर श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे,' ही त्यांची क्रांतिकारी मांडणी समाजाला नवी दिशा देणारी होती. त्यांच्या याच विचारांवर चालण्याचा राज्य शासन प्रामाणिक प्रयत्न करेल," असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या अभिवादन कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अभिजित वंजारी, आमदार संदीप जोशी, तसेच नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.