Mahayuti News | राज्यात नोव्हेंबर पहिल्या पंधरवड्यात निवडणूक, महायुतीत बैठकांवर भर !   

Mahayuti News
राज्यात नोव्हेंबर पहिल्या पंधरवड्यात निवडणूक, महायुतीत बैठकांवर भर !    Pudhari File Photo
Published on
Updated on

नागपूर, राजेंद्र उट्टलवार                                           

राज्यात 10 ते 20 नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यात विधानसभा निवडणुका होतील. विजयादशमीनंतर आचारसंहिता लागू होईल अशी माहिती आहे. याचाच अर्थ पुन्हा एकदा उमेदवारांना 15-18 दिवसांचाच अत्यल्प कालावधी मिळणार आहे. या दृष्टीने महायुतीत सातत्याने विधानसभा मतदारसंघात बैठकांवर भर दिला जात आहे. 80 टक्के जागांवर एकमत झाले असून, उर्वरित जागांचा प्रश्न येत्या आठवड्यात निकाली निघेल अशी माहिती आहे.     

विधानसभा पार्श्वभूमीवर पीएम मोदी २ वेळा महाराष्ट्रात

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदा विदर्भ आणि महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीदेखील ते विदर्भात आले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात एकत्रित असल्याने महायुतीची बैठक होणार असल्याची चर्चा रंगली. बुलडाणा येथे हे तिघेही नेते एकत्रित होते, मात्र दादा मुंबईत आमदारांच्या बैठकीला परतले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या सकाळीच येणार असल्याने आज महायुतीची एकत्रित चर्चा होऊ शकली नाही.

28 नोव्हेंबर पूर्वी राज्यात नवे सरकार अस्तित्वात

28 नोव्हेंबर पूर्वी राज्यात नवे सरकार अस्तित्वात येणार आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीसारखाच अतिशय कमी कालावधी प्रचाराला मिळणार आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीत उमेदवार जाहीर करण्यात कोण आघाडी घेणार यावर बराच खेळ अवलंबून असणार आहे. यानंतर मोठ्या प्रमाणात इनकमिंग,आऊटगोइंग चालेल.

सडेतोड प्रत्युत्तर देण्याची महायुतीची योजना

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलाच्या दृष्टीने तळागाळात पोहोचलेल्या नरेटिव्हला चोख प्रत्युत्तर देण्यात महायुती कमी पडली किंबहुना मोदी सरकारच सत्तेत येणार या फाजील आत्मविश्वासामुळे आपले नुकसान झाल्याचे वास्तव आता या नेत्यांना कळले असून विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याची योजना आखली जात आहे.

80 टक्के जागांवर महायुतीत एकमत; चंद्रशेखर बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील 'पुढारी'शी बोलताना 80 टक्के जागांवर आमचे एकमत झाले असून, उर्वरित जागांवरही लवकरच एकमत होईल. निवडून येईल त्याला तिकीट हा एकच अजेंडा,फार्मूला असणार आहे. मात्र, सेटिंग गेटिंगविषयी बोलले जात असले तरी असा नियम नाही अशी माहिती एका वरिष्ठ नेत्यांनी उघड केल्यामुळे यावेळी उमेदवार बदलावर भाजपचा भर असू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.

288 पैकी 168 जागांवर तूर्तास महायुतीत एकमत

288 पैकी 168 जागांवर तूर्तास महायुतीत एकमत झाल्याची माहिती असून उर्वरित 89 जागांवर येत्या आठवड्यात तीनही पक्षांचे एकमत होईल असा अंदाज आहे. पितृपक्ष संपताच नवरात्राच्या पहिल्या दोन दिवसात भाजपची पहिली यादी जाहीर व्हावी असा प्रयत्न असणार आहे. विदर्भात बहुतांशी जागी भाजप- काँग्रेस असाच मुकाबला होणार असून मुंबई, मराठवाडा खानदेश मध्ये शिवसेना-भाजप तर पश्चिम महाराष्ट्रात भाजप व अजितदादा पवार गटाला झुकते माप दिले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत नैसर्गिक मित्र शिंदे यांच्या शिवसेनेच्या तुलनेत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा भाजपला फारसा फायदा झाला नसला तरी विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा मिळेल. शेतकरी, युवक, लाडकी बहीण योजनांचा फायदा महायुतीला होणार असा दावा केला जात असला तरी तिकीट वाटप करण्यात लोकसभेसारखाच घोळ घातला जाऊ नये, किमान संबंधित उमेदवाराला कामाला लागण्याचे आदेश लवकर दिले जावेत अशी  मागणी महायुतीत सातत्याने केली जात आहे.

महायुतीतील तिकीट वाटप फार्मूला लवकरच ठरणार

येत्या 23 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूर व विदर्भात येत आहेत 23- 24 रोजी एकीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसच्या विभागवार बैठक होत असतानाच भाजपमध्येही विधानसभानिहाय मतदार संघाचा आढावा घेतला जाणार असून, महायुतीतील तिकीट वाटपाचा अंतिम फार्मूला ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news