

नागपूर : लोकसभा निवडणुकीतील वाढलेली ७६ लाख मते आणि शेवटच्या तासात झालेली १५ टक्के मतदानाची वाढ हे गंभीर विषय असून, यावर भाजपने नव्हे, तर थेट निवडणूक आयोगानेच उत्तरे द्यायला हवीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र शंका उपस्थित करत, या प्रकरणाचे 'दूध का दूध, पाणी का पाणी' झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
ओबीसी जनजागरणासाठी आयोजित 'मंडल यात्रे'ला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी नागपुरात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना पाठिंबा देत पवार म्हणाले, "ज्या बापाने पोराला जन्म दिला, त्याच्याकडून ते हिसकावून दुसऱ्याला देण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे. निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळल्यापासूनच या षडयंत्राला सुरुवात झाली." या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आम्ही सोमवारी संसदेत आणि निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी राज्यातील आणि देशातील विविध मुद्द्यांवरही भाष्य केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर बोलताना ते म्हणाले, "दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच आहे. अनेकांच्या पोटात दुखत आहे, त्यांची झोप उडाली आहे, ते होऊ द्या. ते एकत्र आल्यावर आम्ही आमचा निर्णय घेऊ." राज्यातील शेतकरी, ढासळती अर्थव्यवस्था आणि तपास यंत्रणांच्या गैरवापरावरुनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जनतेचे मूळ मुद्दे मागे पडत असून, देशातील आणि राज्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.