पदे येतात जातात, मी खुर्चीसाठी हपापलेलो नाही : एकनाथ शिंदे

Nagpur News: 'दे धक्का' मेळाव्यात सर्वपक्षीय प्रवेश
Eknath Shinde on leadership
'दे धक्का' मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.pudhari photo
Published on
Updated on

नागपूर : पदे येतात जातात, कधी वर खाली देखील होतात. मात्र मी खुर्चीसाठी हपापलेलो नाही, मला पैशाची, ना सत्तेची हाव आहे, मुळात मला संपविणे कठीण आहे. मी उभा झालो तिथून माझ्या माणसांची लाईन सुरू होते. शिवसेनेने आजवर लक्ष दिले नाही मात्र आता विदर्भावर मी अधिक लक्ष देणार आहे. आपल्याकडे प्रवेशासाठी मोठी वेटिंग लिस्ट आहे. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक या पद्धतीने संघटन मजबूत करणार असा इशारा शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शुक्रवारी सायंकाळी दिला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने महायुतीत तीनही पक्ष कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्मभूमीत शिंदे यांनी एकीकडे ठाकरे गटासोबतच विरोधकांना दिलेल्या या इशाऱ्याकडे राजकीयदृष्ट्या बघितले जात आहे. आज शिंदे दिवसभर पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गोंदिया जिल्ह्यानंतर नागपुरात एअरपोर्ट बँक्वेट येथील किरण पांडव यांच्या पुढाकाराने आयोजित' दे धक्का ' या प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.

आज तीन वेगवेगळ्या कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश झाले. मात्र यात मोठे प्रवेश नव्हते यावेळी मंत्री संजय राठोड आमदार कृपाल तुमाने, डॉ मनीषा कायंदे, पूर्व विदर्भ प्रमुख किरण पांडव, मंगेश काशीकर, जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांच्यासह अनेक जिल्हाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उबाठा शिवसेना, काँग्रेस आप, मनसे, प्रहार अशा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला. एकनाथ शिंदे म्हणाले, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार तुम्ही आम्ही आहोत. पक्षात तुमचे स्वागत आहे मात्र आपल्या जवळचा म्हणून कोणाला पद देऊ नका,काम करणाऱ्याला संधी द्या, कार्यकर्ता हेच आपले भांडवल आहे. आमदार ,खासदारांच्या आमच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यांना मोठे करण्याची वेळ आहे. या पक्षात मालक - नोकर नाही. सहकाऱ्यांना सवंगडी मानणारा हा पक्ष आहे घरगडी मानणारा नव्हे,काम करेल तो पुढे जाईल. माझे स्वतः लक्ष राहणार आहे. मला पुरस्कार मिळताच पोटात दुखले. माझ्याविषयी सोडा पण ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री केले त्यांचाही त्यांनी उद्धार केला. मुळात ते डॉक्टरकडून नाहीतर कंपाउंडरकडून औषध घेतात असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. पण सामान्यांना सोन्याचे दिवस यावेत हा आपला प्रयत्न आहे. महाविकास आघाडीत नेहमीच लोककल्याणाच्या योजनांना खोडा घालण्यात आला मात्र लाडक्या बहिणींनीच त्यांना जोडा दाखविला.

ब्रेकिंग दिल्या तरी आमचे ब्रेक अप नाही !

महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत. माध्यमांनी कितीही ब्रेकिंग दिल्या तरी आमचे ब्रेकअप होणार नाही असेही शिंदे आवर्जून म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी होऊ नये म्हणून प्रयत्न झाले. आमच्यात कोल्डवॉर सुरू आहे. शिंदे बैठकीत गेले नाहीत, अशा बातम्या चालवल्या जातात. मात्र मी एक दोनदाच गेलो नाही. काही लोक एकदाच मंत्रालयात गेले असा चिमटा घेतला. लोकसभेला त्यांच्यापेक्षा दोन लाख तर विधानसभेला 15 लाख मते आपल्याला अधिक मिळाली त्यामुळे खरी शिवसेना कुणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भर दिला.

यावेळी त्यांनी शोले मधल्या असरानी यांच्या एका संवादाची आठवण करून दिली मात्र मला संपवण्याचा, गायब करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली. धनुष्यबाण गहाण ठेवला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र फिरलो आणि राज्यातील जनतेने लाडक्या बहिणी, लाडक्या भावांनी महायुतीचे सरकार आणले आज गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्तीच्या दिशेने आहे. पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहेत. उद्योगाच्या दृष्टीने गडचिरोली अग्रेसर होत आहे यावर त्यांनी भर दिला.

'यांनी' केला पक्ष प्रवेश

यावेळी युवक काँग्रेसचे सुमुख मिश्रा, मनसेचे किशोर सरायकर, उबाठाचे दीपक बेले, डॉ ढोकणे प्रहारचे आशिष जयस्वाल आदींना शिवसेनेचा दुपट्टा घालून प्रवेश दिला गेला. याच प्रकारे रामटेक विधानसभा मतदारसंघात कन्हान येथे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. उबाठा माजी जिल्हाप्रमुख राजू हरणे व इतरांनी शिवधनुष्य हाती घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news