

नागपूर : दीक्षाभूमी येथे वंदन करण्यासाठी आम्ही नेहमी येत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा नतमस्तक होतो. या स्थानावरून प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते असे हे बलस्थान असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
रेशीम बागेतील स्मृती मंदिराला भेट दिल्यानंतर शिंदे यांनी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली या निमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट संविधान तयार केले. त्या घटनेवर देशाचा, राज्याचा कारभार चालतो.
सर्व सामान्य माणूस मुख्य प्रवाहात यावा आणि सर्व घटकांना न्याय मिळावा ही तळमळ यात आहे. बंधूता आणि एकतेची शिकवण बाबासाहेबांनी दिली. संविधानामुळेच सर्व सामान्य घटकातील व्यक्ती उच्च पदावर पोहोचू शकतो अशी अनेक उदाहरणे बाबासाहेबांच्या घटनेमुळे आहे. बाबासाहेबांचा आम्हाला अभिमान आहे.
दरम्यान, आज (दि.१४) अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्ताव संदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, मागील साडेतीन वर्षात महायुती सरकारने विदर्भसाठी जे प्रकल्प आणि योजना केल्या या सर्वश्रूत आहेत.राज्यासह मुंबईसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. या राज्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून यंदा अधिवेशन चांगले झाले यावर त्यांनी भर दिला.