

नागपूर : इस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा रोड परिसरातील मेरामंडली स्थानकावर तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाचे कमिशनिंग काम व अन्य कारणांसाठी नागपूरमार्गे धावणाऱ्या ८ रेल्वेगाड्या एप्रिल महिन्यात रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच दहा गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. उन्हाळ्यांमध्ये रेल्वेने प्रवास करण्याची संख्या अधिक असते. अशा स्थितीत रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमार्गे धावणारी गाडी क्रमांक १२१४५ एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-पुरी एक्स्प्रेस, १३ व १५ एप्रिल रोजी धावणारी १२१४६ पुरी-एलटीटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. २०८१३ पुरी-जोधपूर एक्स्प्रेस १६ एप्रिल आणि २०८१४ जोधपूर-पुरी एक्स्प्रेस १८ एप्रिल रोजी धावणार नाही. १२९९३ गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस १८ एप्रिल आणि १२९९४ पुरी गांधीधाम एक्स्प्रेस २१ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे. २०९१७ इंदूर-पुरी हमसफर एक्स्प्रेस १५ व २२ एप्रिल व २०९१८ पुरी-इंदूर हमसफर एक्स्प्रेस १७ व २४ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच याच मार्गाने धावणाऱ्या काही रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. १२८८० भुवनेश्वर-एलटीटी एक्स्प्रेस १७ व २१ एप्रिल रोजी, १२८७९ एलटीटी-पुरी एक्स्प्रेस १६ व १९ एप्रिल, २२८६५ एलटीटी-पुरी एक्स्प्रेस १७ एप्रिल आणि २२८६६ पुरी-एलटीटी एक्स्प्रेस २२ एप्रिल रोजी खुर्दा रोड, टिटलागड, बालंगीर व संबलपूर मार्गे धावणार आहे. २०८२३ पुरी-अजमेर एक्स्प्रेस १७ व २१ एप्रिल, २०८२४ अजमेर-पुरी एक्स्प्रेस १५ व १७ एप्रिल, २२८२८ सूरज-पुरी एक्स्प्रेस १५ एप्रिल, २२८२७ पुरी-सूरत एक्स्प्रेस २० एप्रिल, २०८६१ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस १६ एप्रिल आणि २०८६२ अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस १८ मार्च रोजी खुर्दा रोड-टिटलागड, लाखोली मार्गे धावणार आहे. उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता यामुळे प्रवाशांची मोठी गैरसाय होण्याची शक्यता आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालवाहतुकीतून १७३५.२२ कोटींचा महसूल प्राप्त केला असून आर्थिक वर्षात रेल्वेने १८.७६ दशलक्ष टन मालवाहतूक केली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाचे व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली विभागाने मालवाहतुकीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. कोळसा, लोहखनिज, पोलाद, अन्नधान्य, डोलामाइट आणि मँगनीज यांची १८.७६ दशलक्ष टन मालवाहतूक केली. या माध्यमातून १७३५.२२ कोटी महसूल दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला मिळाला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा मालवाहतूक व उत्पन्नही अधिक राहिले. २०२३-२४ आर्थिक वर्षापेक्षा २०२४-२५ आर्थिक वर्षाचे उत्पन्न ३.७२ टक्के तर मालवाहतूक १८.६६ टक्के अधिक राहिली.