

Nagpur District Illegal Sand Mining Case
नागपूर : बोगस रॉयल्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात केल्या गेलेल्या रेती चोरी प्रकरणी दाखल प्रकरणी शुक्रवारी (दि.९) सकाळपासून ईडीने नागपूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी धाडसत्र आरंभले आहे.
यामुळे सावनेर परिसरासह जिल्ह्यातील रेतीमाफीयांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात येत असलेल्या धाडसत्रामुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे. आज सकाळपासून नागपूर, कामठी, सावनेर आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एकाचवेळी या धाडसत्राला सुरुवात झाली.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमधील आंतरराज्यीय रेती माफियांच्या सुमारे पन्नास जणांच्या टोळीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या राज्य सरकारच्या महसुलाचे नुकसान झाले. याच प्रकरणी नागपूर विभागातील बोगस रॉयल्टी माध्यमातून चोरी प्रकरणी नागपुरातील सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच संदर्भातून सावनेर आणि इतर ठिकाणी ईडीने ही कारवाई केली असल्याची माहिती सूत्राने दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह कागदपत्रे या चौकशी पथकांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.