
नागपूर : राजेंद्र उट्टलवार
निवडणूक म्हटली की एकेका मताला महत्त्व आहे. कधीकाळी मध्य नागपुरात माजी मंत्री काँग्रेसनेते अनिस अहमद यांना केवळ 6 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. विधानसभा निवडणुकीत तृतीयपंथी मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 302 तृतीयपंथी मतदार आहेत. यात सर्वाधिक 104 मतदार हे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघांतर्गत आहेत. गेल्यावेळी विशेष मतदान केंद्राची निर्मिती या मतदार संघात करण्यात आली होती.
निवडणूक प्रक्रियेत मतदानाच्या माध्यमातून सर्वांचा सहभाग असावा, कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक विभागाकडून मतदानवाढीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात येत आहेत. लोकसभेला मिशन डिस्टिंक्शन अर्थात 75 टक्के मतदानासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. मात्र नागपुरात केवळ 54 टक्क्यांवर मतदान होऊ शकले. आता पुन्हा एकदा मतदानाचा दिवस बुधवार आणि सलग सुट्टी नसल्याने लोक मतदानाला बाहेर पडतील असा विश्वास प्रशासनाला आहे. अर्थातच नागपूरकर हा विश्वास कितपत सार्थ ठरवतील हे 20 नोव्हेंबर रोजीच कळणार आहे.
अंतिम मतदार यादीनुसार तृतीयपंथी मतदारांची शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातील संख्या ही २४४ अशी आहे. यात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात २९, नागपूर दक्षिण ८, नागपूर पूर्व ३२, नागपूर मध्य ४०, नागपूर पश्चिम ३१ आणि नागपूर उत्तर मतदारसंघात १०४ अशी एकूण शहरांतर्गत मतदारसंघात २४४ एकूण तृतीयपंथी मतदार आहेत.
ग्रामीण भागातील विधानसभानिहाय मतदारसंघात ५८ तृतीयपंथी मतदार आहेत. यात काटोलमध्ये ६, सावनेर २, हिंगणा २९, उमरेड १, कामठी १८ आणि रामटेकमध्ये २ असे एकूण ५८ मतदार आहेत. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.