

नागपूर - प्रसिद्ध अभिनेता डॉ विलास उजवणे यांचे नागपूर शहराशी विशेष नाते आहे. त्यांनी नागपूरमध्ये आपले बालपण आणि शिक्षण पूर्ण केले. स्थानिक रंगभूमीत त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. नागपूरच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळ्यात २०२४ मध्ये त्यांनी तरुण कलाकारांना मुंबईत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, ‘नागपूरने अनेक महान आणि प्रभावशाली कलाकार घडवले आहेत. मी स्वतः येथे माझ्या ज्येष्ठांकडून खूप काही शिकलो आहे.’ त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईकडे प्रयाण केले.
२०१६ साली विदर्भ गौरव प्रतिष्ठानने त्यांना ‘स्मिता पाटील’ पुरस्काराने सन्मानित केले. काही वर्षांपूर्वी नागपूर आले असताना त्यांना अर्धांगवायूचा त्रास झाला त्यामुळे त्याचा पाय, हात व वाचाही प्रभावित झाली होती. त्यामुळे ते बेलिशॉप मोतीबाग येथे डॉ. प्रवीण डबली यांच्याकडे उपचाराकरिता आले होते. ‘त्यांना बराच फायदा झाला आणि आमचे सबंध घट्ट झाले. पुढे त्यांनी आमच्या घरीही आवर्जून भेट दिली. अर्थातच त्या आठवणी आता आठवणीच राहतील’ अशी आठवण यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार, डॉ. प्रवीण डबली यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितली. त्यांची संवादफेक, चेहऱ्यावरचे हावभाव आणि सादरीकरणाची शैली यामुळे प्रत्येक भूमिका लक्षवेधी ठरली. एक हसतमुख, प्रेमळ आणि सदैव सकारात्मक दृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्त्व होते.
नागपूरकर अभिनेता डॉ. विलास उजवणे यांनी अनेक सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 'डोम', 'इन द नेम ऑफ ताई' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी सामाजिक विषमता, अन्याय आणि मूल्यभंग यावर बोट ठेवणाऱ्या व्यक्तिरेखा रंगवल्या. त्यांच्या संवादफेकीत आणि देहबोलीत एक ताकद होती जी थेट प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचायची.