

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
२०११ साली नागपूर - कळमेश्वर मार्गावरील चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीसाठी शांतिवन प्रकल्पाला मान्यता मिळाली. ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पासाठी शासनाने ४० कोटींचा निधी मंजूर केला. २०१५ मध्ये त्यापैकी ३३ कोटी रुपये उपलब्धही करून देण्यात आले. संग्रहालय, विपश्यना केंद्र, भिक्खू निवास आणि अस्थापना केंद्र यांसारख्या इमारती उभ्या करण्यात आल्या, मात्र आज १४ वर्षांनंतरही या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेलेले नसल्याने महामानवाच्या स्पर्शाने पावन झालेल्या अनेक वस्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
कोणत्या दुर्मिळ वस्तू
या वस्तू संग्रहालयात बाबासाहेबांचा कोट, चष्मा, टाईपरायटर, सदरा अशा तब्बल ३५० वस्तूंवर लखनऊ येथील 'नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कन्झर्व्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी' मार्फत त्यांचे कायमस्वरूपी जतन व्हावे म्हणून रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या वस्तू सध्या नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आल्या असल्या तरी, त्यांचे योग्य जतन करण्यासाठी आवश्यक तापमान आणि सुरक्षित वातावरणाची सुविधा अद्याप चिचोलीत उपलब्ध नाही.
शांतीवन प्रकल्पाच्या रखडलेल्या कामामुळे या वस्तू धूळखात असून, ऐतिहासिक वारशाच्या जतनासंबंधी शासनाची एकप्रकारे उदासीनता यात स्पष्टपणे समोर येते. “चिचोलीतील जुन्या इमारतीत बाबासाहेबांच्या वस्तूंचे केवळ फोटो प्रदर्शित करण्यात येत आहेत. नव्या इमारतीमध्ये आधुनिक संग्रहालय उभारण्याची योजना आहे, पण ती केव्हा पूर्ण होईल, हे कुणालाच माहिती नाही,” अशी खंत भारतीय बौद्ध परिषदेचे विश्वस्त आणि चिचोली संग्रहालयाचे समन्वयक संजय पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने व्यक्त केली.
दरम्यान, नागपूर विभागाच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी, या “प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच बाबासाहेबांच्या वस्तू जनतेसाठी उपलब्ध होतील,” असे सांगितले. मात्र संग्रहालय कधी उघडले जाईल, यावर त्यांनी कोणतीही स्पष्टता केलेली नाही. आवश्यक आणि मिळालेल्या निधीबाबतही त्यांनी बोलणे टाळले.
१४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी शांतिवन प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा शासनाचा मानस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून कामाची चौकशी झाल्यानंतर अनेक बाबी अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. या निष्काळजीपणामुळे समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट पंतप्रधान कार्यालयाकडून फटकारले गेले.
त्यामुळे आता हे अधिकारीही प्रकल्पाबाबत अधिकृतपणे बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. एकीकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्याच्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे त्यांच्या वस्तूंच्या जतनासाठी उभारण्यात आलेला, महामानवाच्या वास्तव्याने पावन झालेल्या नागपुरातील हा संग्रहालयाचा राष्ट्रीय प्रकल्पच रखडला आहे.