

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न नऊ रुग्णालयातील गट-ड संवर्गातील 680 पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्यापैकी 13 उमेदवारांना शनिवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट-ड संवर्गातील मंजूर पदापैकी बऱ्याच वर्षापासून 680 पदे रिक्त होती. रिक्त असलेल्या पदावर सरळसेवा भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीतर्फे पदभरतीची एकत्र प्रक्रिया राबविण्यात आली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना या समितीचे सदस्य सचिव म्हणून नेमण्यात आले होते. रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते.