

नागपूर : 2 ऑक्टोबर रोजी धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासन कामाला लागले आहे. या परिसरात महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष मोहिम राबवून हा परिसर स्वच्छ केला. धम्मचक्रप्रवर्तनाच्या कार्यक्रमाला राज्य व देशभरातून लाखो अनुयायी नागपुरात येणार आहेत. धम्मचक्रप्रवर्तन दिन कार्यक्रम संपेपर्यंत महानगरपालिकेतर्फे या परिसरात स्वच्छता कायम राहिल, यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.
या परिसरात वाढलेली झाडे, झुडपे ग्रास कटरच्या सहाय्याने कापून काढण्यात आली. तसेच या परिसराची खास मोहिमेअंतर्गत सखोल स्वच्छता केली. परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपी वाढलेली होती. तसेच पावसामुळे या परिसरात चिखल जमा झाला होता. गाळ जेसीबीच्या सहाय्याने उचलण्यात आला. या परिसरातील झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या. तसेच फुटपाथ सुद्धा स्वच्छ करण्यात आला.
दीक्षाभूमी परिसरासोबतच या भागातील रस्त्यांची साफसफाई सुद्धा घनकचरा व्यवस्थापन विभागाने आज केली. या मोहिमेत महापलिकेच्या २०० स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सहकार्याने ही मोहिम मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या मार्गदर्शनात राबविली गेली.