नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी लीलावती रुग्णालय मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी आमदार प्रकाश गजभिये यांची भेट घेत प्रकृतीची माहिती घेतली.
यावेळी माय डियर फ्रेंड "प्रकाश'' कसा आहेस, असे शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्गारताच माजी आमदार प्रकाश गजभिये अतिशय भावूक झाले. नुकतेच जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले असता प्रकाश गजभिये पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर श्रीनगर येथून त्यांना विशेष विमानाने मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे वीस लाख रुपयांचा खर्च देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकारने केला.
कधीकाळी जिवलग मित्र असलेल्या मित्राची राजकीय मतभेद विसरून मदत केली. आज या भेटीने सारेच कुटुंबीय भारावले. लीलावती रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, माय डियर फ्रेंड " प्रकाश " जोपर्यंत ठणठणीत होत नाही, तोपर्यंत याला सुट्टी द्यायची नाही, असेही आवर्जून सांगितले.