महाविकास आघाडीच्या काळात मला एकदा नव्हे तर चारवेळा अटक करण्याचा प्रयत्न झाला. यासोबतच भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला मात्र तो आम्ही वेळीच हाणून पाडला. यासंबंधीचे व्हिडिओ सीबीआयला दिले असून अनेक व्हिडिओ आमच्याजवळ आहेत असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.10) माध्यमांशी बोलताना केला.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपच्या अनेक नेत्यांना खोट्या गुन्ह्यात वेगवेगळ्या प्रकरणात अडकविण्याचे आदेश देण्यात आले होते. अनिल देशमुख हे पुढे असलेत तरी त्यांच्या मागे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार होते असा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे.
या संदर्भात फडणवीस यांनी माझ्यासह गिरीश महाजन, प्रवीण दरेकर अशा भाजपच्या अनेक नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे, कारागृहात टाकण्याबाबत परमवीर सिंग जे बोलले हे अगदी सत्य आहे. त्यांनी एकच घटना सांगितली पण असे चारवेळा झाले आहे. या संदर्भातील अनेक व्हिडिओ सीबीआयला दिलेले आहेत. तर अनेक व्हिडिओ अद्यापही आमच्याकडे आहेत असा दावा फडणवीस यांनी केला.
यासोबतच मविआच्या काळातही अनेक चांगले अधिकारी होते. ज्यांनी आमच्याविरुद्धचे हे षडयंत्र खपवून घेतले नाही, सांगितलेले चुकीचे काम करण्यास नकार दिला यावरही त्यांनी भर दिला. अर्थातच परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांचे आता स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच समर्थन केल्याने या आरोपांना आता अधिकच धार आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप- प्रत्यारोप अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर लगेच माध्यमांशी बोलणे टाळले.