

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर गुन्हे शाखा विभागाच्या पथकाने कामठी आणि गणेशपेठ येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये नागपुरातील घरफोडी आणि वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले. या गुन्ह्यांमध्ये पकडलेल्या संशयित आरोपीकडून विविध देशांचे चलन, दुचाकी आणि मोत्यांची माळ असा 3.26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर या घटनेतील दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव शाहरुख खान वलद् हनीफ खान (वय 23 रा. ज्योती नगर,खदान, नागपूर) असे आहे. तर वेदांत उर्फ छोटा कालू रवी चाटे (रा. टिमकी) आणि क्षितिज चौकसे (रा. बुद्ध नगर, पाचपावली) असे फरार संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत गणेशपेठ पोलिसांनी संशयित आरोपीकडून अमेरिकन चलनाचे 1785 डॉलर म्हणजेच 1 लाख 51 हजार रुपये, दुबई, मलेशिया, सिंगापूरच्या करन्सी किंमत 4000 रुपये, याशिवाय वेगवेगळ्या देशाचे करन्सीचे एकूण 59 शिक्के किंमत 3000 रुपये, 25 ग्राम सोन्याची चेन अंदाजे किंमत 87,500 रुपये, एक पांढऱ्या रंगाची मोत्याची माळ किंमत 35 हजार रुपये, एक दुचाकी 45 हजार रुपये, असा एकूण 3 लाख 26 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर या घटनेचा अधिक तपास गणेशपेठ पोलिस करत आहेत.