नागपूर: IND vs ENG 1st ODI | सहा वर्षानंतर आज गुरुवारी (दि.६ फेब्रुवारी) भारत- इंग्लंड क्रिकेट एक दिवसीय सामन्याच्या निमित्ताने क्रिकेटचा फिव्हर जोरात असून थरार रंगला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार अनुभवण्याची संधी नागपूरकरांना विदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठा मैदानावर आलेली आहे. यासाठी नागपूरच नव्हे तर विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथून क्रिकेटप्रेमी नागपुरात दाखल झाले आहेत.
काही मिनिटातच अधिकृत पद्धतीने तिकीट हाउसफुल झाल्यानंतर आणि काळाबाजार करणाऱ्यांना पकडण्यात आल्यानंतर सुद्धा चढ्या दराने तिकीट विक्री झाली. वर्धा रोडवर आज गुरुवारी होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता शक्यतो आपली बस, मेट्रोने प्रवास करा असे आवाहन पोलीस,जिल्हा प्रशासनाने केले आहे.
स्टेडियम परिसरात अडीचशे अन हजारावर अधिक वाहतूक पोलिसांसह 2018 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 11 बॉम्बशोधन नाशक पथकही मैदान परिसरात आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी द्रोणचा वापर केला जात आहे. पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी देखील व्हीसीए परिसरात तैनात आहे. हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये भारतीय खेळाडूंचा मुक्काम असल्याने एक झलक पाहण्यासाठी गेले दोन दिवस या परिसरात लोकांची गर्दी होती.
स्टेडियमवर जाताना येताना खेळाडूंना पाण्यासाठी वर्धा रोडवर चांगलीच गर्दी दिसून आली. शहरातील वातावरण क्रिकेटमय झाले आहे. टीम इंडियाच्या प्रोत्साहनासाठी टी-शर्ट घालून क्रिकेटपटूंचे छायाचित्र घेऊन लोक हॉटेल,स्टेडियमबाहेर दिसले. याच महिन्यात सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही तीन सामन्यांची मालिका महत्त्वाची असून पहिला सामना भारतीय संघाने जिंकावा यासाठी क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेकांनी श्री टेकडी गणेशाला या संदर्भात साकडेही घातले आहे.