

Ramdeobaba University Car Bike stunts
नागपूर : नागपूरच्या रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय,अभिमत विद्यापीठामध्ये ऑटो एक्स्पोच्या नावाखाली धोकादायक कार आणि बाईक स्टंटचे आयोजन करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटच्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर हे स्टंट सादर करण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराला परवानगी कशी मिळाली? असा सवाल आता उपस्थित होत आहे. एखाद्या अॅक्शन चित्रपटातील दृश्यांनाही मागे टाकतील अशी ही दृश्य असली तरी मात्र हे शूटिंग नसून नागपूरच्या रामदेवबाबा विद्यापीठातील ऑटो एक्स्पोतील वास्तव होते.
२४ फेब्रुवारी रोजी “अनुभूती” या कार्यक्रमात कार ३६० डिग्रीमध्ये फिरवणे, सायलेंसरमधून धूर काढणे, बाईक एका चाकावर चालवणे असे धोकादायक स्टंट विद्यार्थ्यांसमोर खुलेआम सादर करण्यात आले.
सुरक्षेची कोणतीही ठोस व्यवस्था नसताना, प्रेक्षकांपासून अगदी अंतरावर हे स्टंट जवळपास दोन तास सुरू होते. अर्थातच यावेळी एखादा अपघात झाला असता, तर त्याची जबाबदारी कोण घेतली असती? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच दिसले नाही.
विशेष म्हणजे या आयोजनाची माहिती प्रशासनाला नव्हती, असा दावा सुरुवातीला विद्यापीठाचे डीन राजेश पांडे यांनी माध्यमांशी बोलताना केला. नंतर गदारोळ होताच विद्यापीठाने स्पष्टीकरण देत सांगितले की, आम्हाला अशा स्टंटची अपेक्षा नव्हती.सर्व संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
एकीकडे देशभरात बेधुंद बाईकस्वार आणि कार स्टंटमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत असताना नामवंत शैक्षणिक संस्थेतूनच असा प्रकार निश्चितच धोकादायक नाही का, विद्यार्थ्यांना नियम, जबाबदारी आणि सुरक्षिततेचे धडे देण्याऐवजी, स्टंटचे ग्लॅमर दाखवले जात असेल तर अशा शिक्षणसंस्थांकडून समाज काय शिकणार? असा सवाल सुजान पालक, नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.