

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूरसारख्या शांत शहरात सोमवारी रात्री जाळपोळ झाली, दगडफेक झाली, ही दुर्दैवी घटना आहे. गेले काही दिवस मंत्रिमंडळात एक मंत्री सतत वळवळ करत आहे, त्याच्या वक्तव्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला आहे. या मंत्र्याला वेळीच आवरले असते. तर ही वेळ आली नसती, असा आरोप मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना घडलेल्या या अप्रिय घटनेनंतर विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले असून नागपुरात रोज हत्या होत आहेत. कायदा सुव्यवस्था गंभीर झाली असल्याने गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. आज पालकमंत्री महालात जाणार आहेत. विरोधकही घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडली हे दुर्दैव आहे, यासाठी जे कोणी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.