

नागपूर : विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे. या आरोपावर काँग्रेस आजही ठाम असून मतदार याद्यांतील गैरप्रकार शोधण्यासाठी काँग्रेसने समिती स्थापन केली आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील ७ सदस्यांची ही समिती असून या समितीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव नागपूरचे प्रफुल्ल गुडदे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परिक्षित विरेंद्र जगताप हे सदस्य आहेत तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड हे समन्वयक आहेत.
मतदार याद्यामधील गैरप्रकाराबाबत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार दाखल केलेली आहे. पण आयोगाने अद्याप समाधानकारक खुलासा केलेला नाही. भाजपा निवडणुका जिंकण्यासाठी गैरमार्गाचा वापर करत असून मतदार याद्यांमध्ये मोठया प्रामणात घोटाळे केले जात आहेत. हे सर्व रोखण्यासाठी ही समिती अभ्यास करून प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहे.