नागपूर : दहा वर्षांत भाजपने नागपूरचा कायापालट केला. काँग्रेसच्या नेत्यांनी नागपूर शहराचा विकास रोखून धरले. काँग्रेसचेच नेते विलास मुत्तेमवार आणि नितीन राऊत यांनीच मिहानच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. आज त्याच मिहानमध्ये मोठ्या कंपन्या आल्या आणि ८८ हजार तरुणांना रोजगार मिळाला. १ लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांची कामे शहरात झाले. नागपूरचे चित्र बदलले असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज गुरुवारी केले.
गडकरी यांच्या हस्ते दक्षिण-पश्चिम, पश्चिम व उत्तर नागपूरच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ‘नागपूर शहराच्या विकासाची ही प्रक्रिया थांबायला नको. कारण हा प्रश्न शहराच्या भविष्याचा आहे. ही उमेदवाराचे भविष्य ठरविणारी निवडणूक नसून जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे,’ असेही ते म्हणाले.(Maharashtra assembly poll)
1947 पासून आजपर्यंत देशाच्या इतिहासात काँग्रेसला मुंबई, नागपूर दिल्लीमध्ये राज्य करण्याची संधी मिळाली. साठ वर्षांपेक्षा जास्त काळ काँग्रेसनेच सत्ता उपभोगली. दहा वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि त्यापूर्वी चार वर्षे अटलजींच्या नेतृत्वातील भाजपच्या सरकारने मोठ्या प्रमाणात विकास केला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
‘काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार केला. संविधान बदलणार असल्याचे पसरवले. मात्र या देशात संविधानाचे तुकडे कुणी केले असतील, तर ते काँग्रेसने केले आहेत. आमच्यावर संविधान बदलाचा आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत,’ अशी टीका गडकरी यांनी केली.(Maharashtra assembly poll)
रिंग रोडवरील कोतवालनगर चौकात दक्षिण-पश्चिमचे महायुतीचे उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. या सभेला हिंगण्याचे आमदार समीर मेघे, माजी आमदार नाना श्यामकुळे, माजी महापौर नंदा जिचकार, संदीप जोशी, प्रकाश भोयर, मुन्ना यादव, राजू हडप, गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. देवेंद्र यांनी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही मोठ्या प्रमाणात निधी दिला. नागपूरची जनता विकासकामांना मत देईल असा विश्वास आहे. त्यामुळे देवेंद्र यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले.