Mukhyamantri Sahayata Nidhi in Nagpur
नागपूर : विदर्भातील गरजू व पात्र रूग्णांना मुख्यमंत्री सचिवालय हैद्रबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष संजीवनी ठरत आहे. जानेवारी २०१७ ते जून २०२५ पर्यंत या कक्षाद्वारे ११ हजार ८४९ रूग्णांना ९९ कोटी ४६ लाख ९४ हजार ४१ रूपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
विदर्भातील गोरगरीब रुग्णांना नागपुरातच हे अर्थसहाय उपलब्ध होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून २०१५ मध्ये हैद्राबाद हाऊस येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची स्थापना झाली. सहाय्यता निधी प्राप्त करण्याकरिता संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांची मुंबई येथे अर्ज सादर करण्यास जाण्याच्या गैरसोयीतून सुटका झाली.हा कक्ष कार्यान्वीत झाल्यापासून नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील गरजू व पात्र रुग्ण हे गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य मिळवण्याकरिता येतात व त्यांना कक्षाद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येते. जानेवारी २०१७ पासून या कक्षातून प्रत्यक्ष रुग्णांना उपचारासाठी निधी उपलब्ध होत आहे.
या वैद्यकीय कक्षाकडून अर्थसहाय्य प्राप्त करण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज, वैद्यकीय खर्चाच्या अंदाजपत्रकाची मूळप्रत, डॉक्टरांच्या सही व शिक्यासह (खाजगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून) प्रमाणीत करणे आवश्यक आहे), तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. १.६० लक्ष पेक्षा कमी), रुग्णाचे आधार कार्ड (महाराष्ट्र राज्याचे)/नवजात बाळासाठी आईचे आधारकार्ड आवश्यक आहे, रुग्णाचे रेशन कार्ड (महाराष्ट्र राज्याचे), संबधीत आजाराचे रिपोर्ट (ईन्व्हेस्टिगेशन रिपोर्टस) असणे आवश्यक, रुग्णाचा पासपोर्ट फोटो, अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी/ शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे, रस्ते अपघात असल्यास एफआयआर ची प्रत जोडणे आवश्यक आहे.
विहीत नमुन्यात मूळ अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय हैद्रबाद हाऊस, सिव्हिल लाईन्स नागपूर येथे सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी रूगणालय हे नोंदणीकृत असणे गरजेचे असून संबंधित रूग्णालयाची नोंद मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या प्रणालीमध्ये असणे आवश्यक आहे. रूग्णालयामध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना/आयुष्यमान भारत योजना/धर्मदाय रूग्णालय/आरबीएसके इत्यादी योजना कार्यान्वीत असल्यास या योजनांमधून रूग्णाचा उपचार होणे बंधनकारक आहे व रूग्णाचा आजार या योजनेमध्ये बसत नसल्यास तसे प्रमाणपत्र खर्चाच्या अंदाजपत्रकासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच रुग्णाला डिस्चार्ज होण्याच्या पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. समिती नियमाप्रमाणे निर्णय घेत जास्तीत जास्त 2 लाखांचे अर्थसहाय्य ह्रदय/यकृत/किडणी/फुप्फुस आणि बोन मॅरो प्रत्यारोपणाकरिता करते,अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख तथा समन्वयक डॉ. सागर पांडे यांनी दिली.