

नागपूर : राजकारणात कधीही काहीही होवू शकते. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले, अजित पवार महायुतीत आले. राजकारणात काहीही होऊ शकते असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात एकप्रकारे शरद पवार, उद्धव ठाकरे कधीही सोबत येऊ शकतात असेच स्पष्ट संकेत दिले. नागपुरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या कौटुंबिक स्वरूपातील विलास फडणवीस स्मृती जिव्हाळा पुरस्कार वितरण कार्यक्रमात एका छोटेखानी पण अगदी मनमोकळ्या मुलाखतीत फडणवीसांनी रोखठोक उत्तरे दिली. सुप्रसिद्ध प्रवचनकार व ज्येष्ठ संपादक विवेक घळसासी यांनी ही मुलाखत घेतली.
२०१९ नंतर २०२४ पर्यत घडलेल्या घडामोडीतून मला ‘नेव्हर से नेव्हर' ही एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही, असे समजून कधी चालायचे नाही. झाले पाहिजे असे नाही. असे व्हावे असे बिलकुल नाही. किंवा ते होणेही फार चांगले आहे या मताचा मी नाही. शेवटी राजकारणात हे लक्षातच ठेवले पाहिजे की, खूप ठामपणे असे होणारच नाही, असे आपण म्हणतो. त्यावेळी राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेवून बसवेल याचा काहीच भरवसा नसतो यावर यावेळी फडणवीस यांनी भर दिला.
मर्यादाहीन पातळी सोडून वैयक्तिक टीका झाली. तरी संयमी राहिलो कारण इतिहास तुम्ही काय केले हे लक्षात ठेवते. त्यामुळे टिकाकारांचा विचार न करता काम करीत राहातो. आज माझ्यावर टीका करणारे कुणाला आठवतही नाही. मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागते. त्यामुळे मला राग आला की खायला दिले की राग शांत होतो असेही ते मिश्कीलपणे म्हणाले.
शरद पवार अतिशय चाणाक्ष आहेत. फेक नॅरेटीव्हचे वातावरण पंक्चर करणारी शक्ती कोण याचा त्यांनी निश्चितच अभ्यास केला असेल. ही शक्ती नियमित राजकारण करणारी नव्हे तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. हे त्यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी रा. स्व. संघाचे कौतुक केले असावे असे वाटते. शेवटी प्रतिस्पर्ध्याचेही कौतुक करावे लागते.
लोकसभेच्या निवडणुकीत फेक नॅरेटीव्ह तयार करण्यात महाविकास आघाडीला यश आले. त्यामुळे विधानसभेत ते अतिआत्मविश्वासात होते. विधानसभेत आमचा एकसंघ विचार परिवार ताकदीने उतरल्याने महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले. या निवडणुकीत फेक नॅरेटीव्हचा फुगा फुटला. एकनाथ शिंदेंचा पक्ष एकखांबी तंबू आहे. विभाजन झाल्यावरही त्यांना चांगले यश मिळाले. त्यामुळे सरकारबाहेर राहून पक्ष चालवता येणार नाही असे मी त्यांना समजावून सांगितल्यावर ते राजी झाले, असेही फडणवीस म्हणाले. बाकी कोणी नाराज वगैरे काही नव्हते. या बातम्या मीडियाने चालवल्या.ड्रायव्हिंगचा शौक मुंबईत रात्री १२ नंतर फिरून पूर्ण करतो अशी कबुलीही त्यांनी दिली.